नाशिक : राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या इस्क्रो खात्यातून आतापर्यंत चार हजार २०० ठेवीदारांना सुमारे तीन कोटी ७५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित खातेदारांचे पैसे परत करण्यासाठी मैत्रेयचे संचालक इस्क्रो खात्यामध्ये पैसे टाकत नसल्याने कंपनीच्या सील न करण्यात आलेल्या मालमत्तेची विक्री करून त्यातील रक्कम या खात्यामध्ये टाकण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे़जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार मैत्रेय फसवणुकीतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी इस्क्र ो खाते उघडण्यात आले़ कंपनीतील ठेवीची मुदत पूर्ण झालेल्या संभासदांची प्राधान्यक्रमानुसार यादी दर आठवड्याला सरकारवाडा पोलीस व गठित समितीतर्फे न्यायालयाकडे सादर केली जाते़ या यादीस मंजुरी मिळाल्यानंतर हे पैसे ठेवीदारांच्या खात्यात वर्ग केले जातात़मैत्रेयच्या इस्क्रो खात्यात संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी दोन टप्प्यांमध्ये इस्क्रो खात्यात सहा कोटी ३० लाखांची रक्कम जमा केल्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला़ मात्र, जामीन मंजूर झाल्यानंतर या दोघांनीही इस्क्रोमध्ये एकही रुपया भरलेला नाही़ पोलीस प्रशासन इस्क्रोमध्ये अधिक रक्कम जमा होण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यास संचालक मात्र दाद देत नाही़ मैत्रेयने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या असल्या तरी या कंपन्यांचेच प्रकल्प अर्धवट असल्याने कंपनीची रक्कम अडकून पडली आहे़ या कंपन्यांनी मैत्रेयला रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे़ त्यामुळे पोलिसांनी मैत्रेयने खरेदी केलेल्या ग्रीन झोनमधील जमिनींची विक्री करून तो पैसा इस्क्रोमध्ये जमा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़ (प्रतिनिधी)
मैत्रेयच्या ठेवीदारांना पावणे चार कोटींचे वाटप
By admin | Updated: September 27, 2016 01:50 IST