चांदवड : चांदवड तालुक्यातील राहुड घाटात दुपारी ४.३०वाजेच्या सुमारास दुधाचा टॅँकर पलटी होऊन त्यातील २० हजार लिटर दूध वाहून गेले. तर परिसरातील नागरिकांनी मिळेल त्यात दूध भरून वाहून नेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उशिरापर्यंत पोलीस पोहोचले नाही. धुळे येथून मुंबईकडे दूध घेऊन जाणारा टॅँकर क्रमांक एम.एच. ०४ / ई.बी. ०९८४ हा सुमारे २० हजार लिटर दूध घेऊन जात असताना राहुड घाटातील नेहमीच्या अपघात स्थळाजवळ हनुमान मंदिराजवळ टॅँकरचालकाचा ताबा सुटल्याने टॅँकर पलटी होऊन त्यास गळती सुरू झाली. या अपघातात टॅँकरचालक सत्यनारायण वर्मा हा किरकोळ जखमी झाला. सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रहदारीतील अडथळा दूर केला तर क्रेनच्या साहाय्याने टॅँकर बाजूला करण्याचा प्रयत्न केला असताना परिसरातील नागरिक दूध भरून नेत असल्याने अडचण निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर स्वरुपात जखमी झाले नाही. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर ) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात दुधाचा टॅँकर पलटी होऊन सुमारे २० हजार लिटर दूध वाया गेल्याने त्यावर उपाययोजना करताना सोमा कंपनीचे कर्मचारी छायाचित्रात दिसत आहे.
राहुड घाटात दुधाचा टॅँकर उलटला
By admin | Updated: November 17, 2015 22:39 IST