पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्व अडतदार व्यापाऱ्यांची पिंपळगाव बसवंत येथे बैठक होऊन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कुठल्याही शेतमालाची खरेदी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सोहन भंडारी यांनी जिल्ह्यातील सर्व अडतदार, व्यापारी याची बैठक आशीर्वाद मंगल कार्यालयात आयोजित केली होती. नाशिकसह जिल्ह्यातील व्यापारी या बैठकीस उपस्थित होते. शेतमालातून कुठल्याही प्रकारे अडत, हमाली, तोलाई कापता येणार नाही तसेच शेतकऱ्यांना शेतमाल कुठेही विकता येईल या शासनाच्या परिपत्रकावर बैठकीत चर्चा करण्यात आली. आजपर्यंत बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाच्या कुठल्याही शेतमालात कपात नव्हती. उलट बाजारात शेतकरी वर्गाला मालाला चढाओढीत अधिक भाव देऊन रोख पैसे देण्यात येत होते. एकीकडे दुष्काळी स्थिती असून, शेतकरी वर्गाला काही देता येत नाही, तर दुसरीकडे चांगल्या चालू असलेल्या बाजार समितीत खेळ करण्याचे काम करत आहेत. जोपर्यंत याचा परिणाम शेतकरी वर्गाला होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. (वार्ताहर)
व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद
By admin | Updated: July 9, 2016 00:33 IST