पांडाणे : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगीदेवीच्या मंदिरात सध्या भाविकांना मर्कटलीलांचा त्रास सहन करावा लागत आहे. भाविकांच्या हातातील प्रसादावर माकडे डल्ला मारत असल्याने माकडांच्या या उपद्रवामुळे भाविक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारात अधिक वाढ झाल्याची तक्रार भाविकांकडून होत आहे.गडावरील माकडांच्या त्रासाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार या ठिकाणी आलेले भाविक करीत आहेत. प्रशासन त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने भाविकांची नाराजी आहे. यात्राकाळात भाविकांचा ओघ जास्त असल्यामुळे भाविक यात्रा टाळून आॅक्टोबर महिन्यात दर्शनासाठी येत असतात. गर्दीऐवजी शांतपणे दर्शन घेता यावे यासाठी यात्रा संपल्यावर भाविक गडावर येत असतात. गडावर यात्राकाळात माकडांचा मुक्त संचार असतो. गर्दीमुळे माकडांना बऱ्यापैकी खाण्यासही मिळते. परंतु त्यानंतर माकडांना पुरेसे खाद्य मिळत नसल्यामुळे अशावेळी माकडे प्रसादावर तुटून पडत आहेत. हा नित्याचाच अनुभव असला, तरी गडावरील माकडांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हा उपद्रव अधिक वाढल्याचा भाविकांचा अनुभव आहे. सध्या गडावर येणाऱ्या भाविकांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मर्कट भाविकांचा प्रसाद, नारळ इतकेच नव्हे तर मोबाइलदेखील पळवून नेत असल्याचा अनुभव काही भाविकांना आला आहे.माकडांचा त्रास वाढण्यापूर्वीच प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गडावर येणाऱ्या भाविकांनी व्यक्त केली आहे.
मर्कटलीलांनी भाविक त्रस्त
By admin | Updated: October 24, 2014 01:04 IST