नाशिक : सरकारला दुष्काळाची जाणीव करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजिबलमाफी व दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. १५) जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी पक्षातर्फे ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. कळवण : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून, 1972 पेक्षा भीषण दुष्काळ कळवण या आदिवासी तालुक्यात देखील असल्याचे चित्र आहे. या भयावह स्थितीत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पण, दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कळवण येथे १५ सप्टेंबर रोजी मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी कळवण येथे आयोजित बैठकीत दिली ,तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती ,अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार होते.यावेळी पक्ष संघटना संघटनबाबत चर्चा करण्यात येऊन आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित असल्याने वाढीव प्रवेश संख्येला मंजुरी मिळावी या मागणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याबाबत व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा यामागणीसाठी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उपस्थित राहावे असे आवाहन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी यावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, जितेंद्र पगार, संदीप वाघ, आशुतोष आहेर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यात बैठका
By admin | Updated: September 14, 2015 23:07 IST