येवला : तब्बल २० वर्षांनंतर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील मुले- मुली येवला येथे एकत्र जमले होते. सर्व विद्यार्थी वयाच्या चाळिशीतील होते. पण उत्साह मात्र विशीतील तरुणपणीचा जशाचा तसा होता. १९९४-९५ चे विद्यार्थी एकत्र आले, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह शिगेला पोहचला होता.राजू पवार नावाच्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या युवकाला सर्व मित्रांना एकत्र करून महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर घेण्याची कल्पना सुचली. त्याने लगेच आपले जिवलग मित्र नीलेश पटेल यांना ही कल्पना सांगितली. नीलेश पटेल यांनीदेखील लगेच होकार दिला. त्यानंतर ज्योती ठोंबरे(नाशिक), कविता खटावकर (पुणे), सुचिता तळेकर (पिंपळगांव ब.), मनीषा पाठक (नाशिक), प्रसाद लोणारे (कल्याण), संजय सूर्यवंशी (नाशिक), अभय लोढा (नाशिक), महेश कोटमे (येवला) यांच्या सोबत पवार यांनी बैठक आयोजित करून १५ नोव्हेंबर दिवस नक्की केला. ९० दिवसांचे हे मिशन संस्कृती ऋणानुबंध म्हणून जोपासण्यात येऊन व्हॉट्सअॅपवर कला आणि वाणिज्य महाविद्यालय ९५-९६ असा ग्रुप तयार करत १०० मित्र- मैत्रिणी यावर जोडले गेले.या सर्व सदस्यांना जोडण्यासाठी नेमिचंद कांकरिया, सुनील पैठणकर, मिलिंद पवार, एकनाथ भालेराव, शिवाजी भालेराव, गणेश कासार, प्रकाश कांगणे यांची मोलाची मदत झाली. १५ नोव्हेंबरला सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य गमे, गो.तु. पाटील, किरण परदेशी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माणिकराव शिंदे, गोल्डनमॅन पंकज पारख, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, ग्रंथपाल पवार मामा या कार्यक्रमासाठी शेंगदाणेवाला आण्णा यालाही आमंत्रित करण्यात आले होते. राजू पवार यांनी गेल्या तीन महिन्यांपासून ‘मिशन संस्कृती ऋणानुबंध’ अभियान यशस्वी केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पुढील वर्षी ९४-९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचा संकल्प राजू पवार यांनी व्यक्त केला.माणिकराव शिंदे , गो. तु. पाटील व किरण परदेशी यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी शाळेतील गमतीदार किस्से सांगून सर्वांना हसविले. नीलेश पटेल यांनी सर्वांना प्रथम स्वत:वर प्रेम करा असा मौलीक प्रेमाचा सल्ला दिला. तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मनीषा भसाळे (पुणे) यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना पुणे येथे ८० टक्के सवलतीत उपचार करुन दिले जातील असे सांगितले. राजू पवार यांनी प्रेमलीला या गाण्यावरील नृत्याने सर्वांना थिरकायला लावले. तसेच ज्योती ठोंबरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
येवल्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By admin | Updated: November 19, 2015 23:48 IST