सातपूर : येथील ट्रायकॉम इंडिया कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात कामगार उपआयुक्तांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या बैठकीत काहीही निष्पन्न निघू न शकल्याने गेल्या आठ दिवसांपासून संप सुरूच आहे. सोमवारी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.गेल्या १८ महिन्यांपासून वेतनवाढीच्या करारावर सकारात्मक बोलणी होत नाही, दर महिन्याला ७ तारखेच्या आत वेतन करण्यात यावे, दिवाळीचा बोनस दिवाळीपूर्वी मिळावा, निलंबित कामगारांना कामावर घेण्यात यावे, युनियन प्रतिनिधींवर खोटे गुन्हे दाखल करू नये यांसह विविध मागण्यांसाठी सीटू युनियनच्या नेतृत्वाखाली कामगारांनी २३ आॅक्टोबरपासून ट्राय कॉम इंडिया कंपनीतील कामगारांनी संप पुकारला आहे. दरम्यानच्या काळात कामगार उपआयुक्त कार्यालयात अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस व्यवस्थापनाच्या वतीने चिराग शर्मा व राहुल वारे, तर युनियनच्या वतीने अॅड. आर.एस. पांडे, सीताराम ठोंबरे, युनियन प्रतिनिधी पंकज बोरसे, रंजना चव्हाण, अमोल जाधव, विकास गवांदे आदिंनी चर्चेत भाग घेतला. युनियन आणि व्यवस्थापन आपापल्या मुद्द्यांवर काम राहिल्याने चर्चेतून मार्ग निघू शकला नाही. या कंपनीत डाटा एन्ट्रीचे काम केले जाते. कंपनीत २५० महिला व १०० पुरुष असे ३५० कायम कामगार आहेत. २०१३ साली यशस्वी करार झाला होता. त्यानंतर कराराची मुदत संपल्याने नवीन करार करण्यास व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
‘ट्रायकॉम’ संप प्रकरणी उद्या उपआयुक्तांकडे बैठक
By admin | Updated: October 31, 2015 22:13 IST