नाशिक : अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष दादा गोरे यांच्यासह महामंडळाचे अन्य पदाधिकारी तसेच लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर सविस्तर खल करून ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे.
साहित्य महामंडळाचे पदाधिकारी शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच नाशिकमधील ऑस्पिशिया या हॉटेलच्या दालनात बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तसे काहीच घडले नाही. केवळ कार्यक्रमपत्रिकेत कोणत्या चर्चा, परिसंवाद घ्यायचे, त्यावरच चर्चा रंगली होती. त्यात संमेलनासाठीचे प्रतिनिधी शुल्क, संमेलनातील पुस्तक विक्रीसाठीच्या गाळ्यांची दर निश्चिती तसेच संमेलनात घेतल्या जाणाऱ्या ठरावांबाबतदेखील चर्चा करण्यात आल्याचे समजते. जे ठराव खरोखर शक्य असतील, त्याचा पाठपुरावा करता येईल त्यांचाच संमेलनात अंतर्भाव करण्यात यावा, असा सूरदेखील त्यात व्यक्त करण्यात आल्याचे समजते. या बैठकीप्रसंगी महामंडळाचे कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, कपूर वासनिक, रामचंद्र काळुंखे, प्रा. उषा तांबे, मिलिंद जोशी, दिलीप मानेकर, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांच्यासह लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
ढोबळ आराखडा आखणी
या दिवसभराच्या बैठकीमध्ये केवळ नाशिकमधील साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका निश्चिती, परिसंवाद, कोणत्या चर्चासत्राला कोण येईल, कविसंमेलनाची धुरा कुणाकडे सोपवायची या सर्व बाबींचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला. ग्रंथदिंडीनंतर संमेलनाचे उद्घाटन सत्र, त्यानंतर निमंत्रित कविसंमेलन, मुलाखत, प्रख्यात लेखक आणि प्रकाशकाचा सत्कार आणि सायंकाळी करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी कथाकथन, स्मृतिचित्रे, परिसंवाद तर तिसऱ्या दिवशी अध्यक्षीय भाषणाने समारोप असा तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला आहे.
इन्फो
बालसाहित्य संमेलन मेळाव्याचा प्रस्ताव
भविष्यात मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर संमेलनात बालसाहित्याला आणि बालसाहित्यिकांना काही स्थान देण्यात यावे, असा प्रस्ताव लाेकहितवादी मंडळाच्या वतीने संजय करंजकर यांच्यावतीने मांडण्यात आला आहे. त्याबाबत महामंडळानेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बालसाहित्यासह संमेलनात नवकवींच्या कट्टा तसेच बालकवींचा कट्टादेखील ठेवण्याचा विचार मांडण्यात आला आहे.
फोटो कॅप्शन (२३ पीएचजेएन ६२)
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेचा आराखडा निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. समवेत उपाध्यक्ष दादा गोरे, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले, प्रतिभा सराफ, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे आदी.