लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : फेरीवाला झोनची अंमलबजावणी करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने हॉकर्स युनियनच्या मागण्यांचा विचार करून योग्य ते नियोजन करावे, अशी अपेक्षा सातपूर विभागीय कार्यालयात आयोजित फेरीवाला धोरण बैठकीत व्यक्त करण्यात आली. महापालिका उपायुक्त हरिभाऊ फडोळ, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि हॉकर्स युनियन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरसेवक तथा मनसे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले की, फेरीवाला झोन योजना लागू केल्यानंतर रस्त्यावर अतिक्र मण होता कामा नये. तसेच गावातील मंडईतील व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. मंडई बाहेरील भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक सीमा निगळ यांनी केली. यावेळी नगरसेवक दीक्षा लोंढे, नयना गांगुर्डे, योगेश शेवरे, राधा बेंडकोळी यांनीही चर्चेत भाग घेतला. हॉकर्स युनियनचे नेते शांताराम चव्हाण, जावेद शेख, शिवाजी भोर, पुष्पा वानखेडे, शशी उन्हवणे, दत्तात्रय मोराडे आदींसह व्यावसायिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. तर महापालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरात जी काही फेरीवाला आणि ना फेरीवाला झोन घोषित केलेले आहेत. त्यातील ९० टक्के आम्हाला मान्य आहेत. उर्वरित १० टक्के मान्य नाहीत. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. त्यातील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा फेरीवाला धोरणाला विरोध करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हॉकर्स संघटनेचे नेते शांताराम चव्हाण यांनी दिला आहे.
सातपूरला फेरीवाला झोनसंदर्भात बैठक
By admin | Updated: July 16, 2017 00:08 IST