नाशिक : जलसंपदा खात्यातील घोटाळ्याबाबत येत्या दोन आठवड्यात गौप्यस्फोट करणार असून, याप्रकरणी माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल माझ्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचीही नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी महाजन हे त्र्यंबकेश्वर येथे आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, जलसंपदातील घोटाळ्याप्रकरणी मला एक ठेकेदार भेटायला आला होता. जलसंपदातील ११०० कोटींच्या कामांसाठी स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी १०० कोटींची आॅफर मला संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आली होती. याप्रकरणाच्या फायली आमच्या ताब्यात असून, जलसंपदातील घोटाळे येत्या दोन आठवड्यात उघड करून प्रकरणे बाहेर आणू असेही महाजन यावेळी म्हणाले. ज्या ज्या कंत्राटदारांनी मला एसएमएस केले, त्याचीही माहिती माझ्याकडे उपलब्ध असून, त्याचीही खातेअंतर्गत चौकशी करण्यात येईल. या खात्यात २० ते २४ टक्क्यापर्यंत लाच दिली जात होती अशी पुष्टी त्यांनी जोडली.यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी १०० कोटींची लाच देऊ पाहणाऱ्या ठेकेदाराचे नाव महाजन जाहीर करणार नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना महाजन यांनी माझ्याबरोबर अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही माझ्याबरोबर नार्को करा. त्याचबरोबर जलसंपदाचे दोन वरिष्ठ अधिकारी व चार ठेकेदारानाही नार्को टेस्टसाठी बोलवावे जेणेकरून या सगळ्या घोटाळ्याचे सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. महाजन यांच्या आवाहनावर मात्र राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. (प्रतिनिधी)
माझ्याबरोबर अजित पवार, तटकरेंचीही नार्को टेस्ट करा
By admin | Updated: January 2, 2015 00:42 IST