नाशिक : महापालिकेच्या १५व्या महापौर-उपमहापौर पदांसाठी मंगळवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार असून, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार (दि.३) पासूनच अर्ज वितरणास प्रारंभ होणार आहे, तर माघारीची प्रक्रिया १४ मार्चलाच विशेष महासभेत होईल. दरम्यान, महापालिकेत ६६ जागा मिळवत भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर-उपमहापौर पदांसाठी भाजपातच चुरस निर्माण झाली असून, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महापौरपदाची माळ भाजपाच्या इच्छुक पाचही नगरसेवकांपैकी कुणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता वाढली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ६६ जागा प्राप्त करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्याखालोखाल शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाला पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेले आहे.
महापौरपदाचा १४ मार्चला फैसला
By admin | Updated: March 3, 2017 02:11 IST