नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी झाला की ‘पार’ पडला, याची चिकित्सा नाशिककरांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांकडून होण्यापूर्वीच यशस्वीतेचा डांगोरा पिटणाऱ्या मुखंडांच्या ‘कर्तृत्वाची’ (न केलेल्या) दखल थेट सातासमुद्रापल्याड घेतली गेली आणि मुखंडांना अमेरिकावारीचे आवतण धाडले गेले. दि.२६ आणि २७ आॅक्टोबरला होणाऱ्या याच अमेरिकावारीचे ‘कवित्व’ आता महापालिका स्तरावर वेगवेगळ्या चर्चेतून कानावर पडू लागले असून, ज्यांनी कमरतोड मेहनत केली त्यांच्या पाठीवर साधी शाबासकीची थाप तर सोडाच पण अमुक एका किरकोळ कामात कसूर केली म्हणून थेट समज देणारे पत्र देऊन पाठीत धपाटे घालण्याचा प्रकार सुरू झाल्याने ‘धन्याला मलिदा, चाकराला धत्तुरा’ अशी टीपणी ऐकायला मिळत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन जे दोन-तीन वर्षांपासून विविध खात्यांच्या माध्यमातून केले जात होते, ते नियोजन दि. २९ आॅगस्टला पहिल्या पर्वणीला कसे साफ कोलमडले आणि फसले याबाबतची अपकीर्ती साऱ्या जगभर जाऊन पोहोचली. भाविकांना रोखण्यात यशस्वी झालेल्या प्रशासनाच्या नियोजनाचा पंचनामा चोहोबाजूने झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला बाहेरून अनुभवी अधिकारी आणून फेरनियोजन केले गेले. त्यातही कितपत यश आले, याची महती माध्यमांनी वेळोवेळी गायिली आहे. सिंहस्थ कुंभपर्वकाळातील अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर सिंहस्थ यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटला गेला आणि एकमेकांची पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा प्रशासनातील मुखंडांमध्ये लागली. नाशिककरांकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कथित यशाबद्दल जाहीर नागरी सत्कार सोहळा होईल तेव्हा होईल परंतु सातासमुद्रापल्याड असलेल्या अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि मीडिया लॅब केंब्रिज या संस्थांच्या वतीने बोस्टन येथे दि. २६ व २७ आॅक्टोबरला होणाऱ्या ‘कुंभथॉन’ परिषदेत प्रशासनातील मुखंडांसह लोकप्रतिनिधींची गौर मांडून हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. या अमेरिकावारीसाठी लोकप्रतिनिधींसह मुखंडांना निमंत्रित करण्यात आल्याने अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई-ठाणे वारी सुरू आहे. सध्या महापालिका वर्तुळात याच अमेरिकावारीवरून चर्चेचे फड रंगू लागले असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात महिनाभर आपला बाडबिस्तारा साधुग्राम, गोदावरीघाट तसेच भाविकमार्गावर लावणाऱ्या आणि मरमर मेहनत करणाऱ्या संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर साधी शाबासकीची थाप अद्याप पडलेली नाही; परंतु न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मुखंडांची अमेरिकावारी घडत असल्याने नाराजीचाही सूर उमटत आहे. साध्या श्रमपरिहाराचेही आयोजन करणे तर दूरच; परंतु काही अधिकाऱ्यांना एखाद्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत थेट समज देणारे ‘प्रेमपत्र’ पाठविले जात असल्याने विस्तवाची धग आणखी वाढत चालली आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांना जडले आजार
महापालिकेत सध्या एकूणच प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीबाबत अधिकारी-कर्मचारीवर्ग धास्तावला असून, प्रत्येकाची ‘स्मार्ट’ होण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. परंतु त्यात पडझडच अधिक होत असल्याने अधिकारी-कर्मचारी कमालीच्या मानसिक तणावाखाली आहे. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यामुळे आजार जडले असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी आयुक्तांनी आर्ट आॅफ लिव्हिंगसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती, शिवाय त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे. सदर उपक्रमांची गरज आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना भासू लागली असून, लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्याची चर्चाही कानावर पडू लागली आहे.