खामखेडा : बोहाडा उत्सवासाठी लागणाऱ्या देवदेवतांचे मुखवटे बनविण्याची कला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी गावामध्ये करमणुकीची साधने नव्हती. ग्रामीण भागामध्ये गावातील सर्व लोक एकत्र येऊन सार्वजनिक उत्सव साजरा करीत असे. त्यात बोहाडा उत्सवाला फार महत्त्व होते. हा उत्सव तीन दिवस चालत असे. गावातील लोक एकत्र जमून या उत्सवाचे आयोजन करत. बोहाडा उत्सवामध्ये देवदेवतांचे मुखवटे धारण करून संबळ वाद्याच्या ठेक्यावर नाचत असत. यात गणपती, सारजा, एकादशी, दुर्वादशी, महादेव, मारुती, गरुड, चंद्र, सूर्य, गजासूर, बकासूर, राम, लक्ष्मण, सीता, रावण, देवी, शकासूर, विदूषक असे अनेक प्रकारे मुखवटे लागत असे.हे मुखवटे बनविण्याची कला खामखेडा येथील ठाकूर समाजातील रामसिंग ठाकूर यांच्या घराण्यात होती. माधव आणि तुळशीराम ठाकूर वडिलांना मुखवटे बनविण्याच्या कामात मदत करीत. बदलत्या काळानुसार करमणुकीच्या साधनांमध्ये बदल होत गेला. विज्ञानाने प्रगती केली. घराघरांमध्ये दूरदर्शन संच आले आणि हा बोहाडा उत्सवाचे महत्त्व कमी होत गेले; परंतु हरी धोंडू ठाकूर यांनी मात्र आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. नवरात्रामध्ये गावामध्ये देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. तेव्हा एक दिवस करमणूक म्हणून तरुणांना एक दिवस अगदी मोजके म्हणजे गणपती, सरस्वती, महादेव, राम, सीता, लक्ष्मण, मारुती आदि मुखवटे मोफत देऊन लहानसा काही तासांचा बोहाडा उत्सव साजरा करायला लावतात. (वार्ताहर)
मुखवटे नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: July 11, 2014 00:42 IST