शैलेश कर्पे सिन्नरसिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सहा महिन्यांपूर्वीच पार पडली. त्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती व प्रक्रिया गटातून बाजार समितीवर प्रतिनिधी निवडीसाठी घडलेल्या घडामोंडींनी पुन्हा एकदा सिन्नरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बाजार समितीवर प्रक्रिया गटातून संचालक निवडण्यासाठी कधी नव्हे एवढे महत्त्व प्राप्त झाल्याचे शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत दिसून आले. एकंदरीत सिन्नरच्या राजकीय मैदानात एकमेकांचे दोर कापण्याहून रंगलेली ‘काटाकाटी’ लक्षवेधी ठरली आहे. सुमारे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध आत्तापासूनच सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यात राज्यात व तालुक्यात सत्तांतर झाल्याने अनेकांच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या आहेत. राज्यात व देशात युतीची सत्ता असली तरी तालुक्यात विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी पहायला मिळत आहे. याचे प्रत्यंत्तर बाजार समितीवर नगरपालिका, पंचायत समिती व प्रक्रिया गटातून संचालक प्रतिनिधी पाठविण्याच्या निवडीच्या प्रक्रियेतून दिसून आले. सिन्नर बाजार समितीवर संचालक म्हणून तीन प्रतिनिधी पाठवायचे असून, त्यात आत्तापर्यंत आमदार राजाभाऊ वाजे व भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे या परस्पर विरोधी गटाला प्रत्येकी एकेक जागा मिळाली आहे. पंचायत समितीची मासिक बैठक बाजार समितीवर प्रतिनिधी पाठविण्याच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली होती. पंचायत समितीत कोकाटे गटाची सत्ता असतानाही त्यांना अपेक्षित व्यक्तीला संचालक म्हणून पाठविता आले नाही. मतदान टाळण्यासाठी पंचायत समितीतील सत्ताधारी गटाला कायदेशीर आधार घेण्याची वेळ आली. पंचायत समितीचे सभापती बाजार समितीचे पदसिद्ध संचालक असतात, या मुद्द्याचा आधार घेऊन संगीता विजय काटे यांना संचालक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सत्ताधारी कोकाटे गटातील दुफळीचे दर्शन घडले. प्रक्रिया गटातून संचालक निवडीसाठी झालेली निवडणुकीही अतिशय चुरशीची झाल्याचे दिसून आले. शिवसेना व भाजपा या परस्पर विरोधी पदाधिकाऱ्यांसह अनेक मातब्बर नेतेमंडळी निवडणुकीत धावपळ करताना दिसून आले. आमदार राजाभाऊ वाजे यांनीही या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे चित्र होते. त्यामुळे दोन्ही गटाने सदर निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केल्याचे दिसले. ५१ मतदार असणाऱ्या प्रक्रिया गटात सुरुवातीला कोकाटे वर्चस्व राखतील असे वाटत होते; मात्र वाजे गटाने डावपेच लढवित बाजी मारली. कोकाटे गटाला बहुमत दिसत असतानाही हार पत्करण्याची वेळ आली आणि प्रक्रिया गटातून कणकोरी येथील अनिल दत्तू सांगळे यांचा विजय झाला. पंचायत समितीतून कोकाटे गटाच्या संगीता काटे व प्रक्रिया गटातून वाजे गोटातील अनिल सांगळे यांची बाजार समितीवर संचालक म्हणून निवडले आहेत. या दोन्ही निवडीप्रसंगी लढविलेले डावपेच व राजकीय कट-शह चांगलेच गाजले. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सेना-भाजपा यांच्यातच चुरशीच्या होईल, याची झलक यानिमित्ताने पहायला मिळाली.
बाजार समितीच्या मैदानासाठी ‘राजकीय काटाकाटी’
By admin | Updated: January 18, 2016 22:20 IST