त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक कृउबा समितीने खरेदी केलेल्या जागेच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले असून, याबाबत मूळमालकांना नाशिक कृउबाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी धमका-वल्याची तक्रार दाखल केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी भाऊ मोरे यांची गट नं. १०४ एकूण क्षेत्र १ हेक्टर ७० आर शेतजमीन होती. सन १९७२ साली या जमिनीतून १ हेक्टर १७ आर क्षेत्र त्र्यंबकेश्वर सहकारी भातगिरणी यांना (दक्षिणेकडील) विक्री केले होते. त्यासाठीचे रितसर खरेदीखतही झालेले होते. भातगिरणीने ०.५ गुंठे जागा शेतकरी सहकारी संघास विक्री केली होती. तसेच ५८.५ क्षेत्र कृउबा समितीला विक्र ी केले, तर ५८.५ क्षेत्र नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला विक्री करण्यात आले आहे. उर्वरित उत्तरेकडील क्षेत्र मूळ मालक मयत गणपत भाऊ मोरे यांच्या सध्याच्या वारसांच्या कब्जेवहिवाटीत आहे. त्यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात तारेचे कुंपण केले आहे. दरम्यान, संपूर्ण गटाची मोजणी केली असता गटाच्या दक्षिणेकडील गट नं. १०५च्या मालकाचे २५ गुंठे जागेत अतिक्रमण झाल्याचे जागेच्या नकाशावरून दिसत आहे. याबाबत जमीनमालकाच्या वारसांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित लोकांनी पोलीस ठाण्यातदेखील १०००/५०० माणसे आणून रातोरात कुंपण तोडण्याची धमकी दिली आहे. वास्तविक, महाराष्ट्र को-आॅप. बँकेने जागा जप्त केलेली असताना पोलीस ठाण्यातच संबंधितांनी बळाचा वापर करून धमकी देण गैर आहे. बाजार समितीने दिलेल्या तक्र ार अर्जात म्हटले आहे की, जागेबाबत न्यायालयीन वाद चालू असून, निकाल लागेपर्यंत तारेचे कुंपण लावू नका. निकाल लागल्या-नंतर रितसर चतु:सीमेप्रमाणे खुणा करून त्यानंतरच कुंपण लावावे. येथे मराठा विद्याप्रसारक समाजाने आपल्या इमारतीचे बांधकाम करताना बाजार समितीच्या जागेकडे बांधकाम केले आहे, तर गट नं.१०५ (दक्षिणेकडे) गेलेली सुमारे २५ गुंठे जागा सोडून दिली आहे. त्यामुळेच हा वाद उद्भवला असल्याचे बोलेले जात आहे. सध्या तरी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या जागेमागे शुक्लकाष्ट लागले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत दोन ते तीन पंचवार्षिकपासून त्र्यंबकेश्वरला उपबाजार आवार सुरू करू तसेच शेतकऱ्यांच्या युवावर्गासाठी बाजार समितीतर्फे गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देऊन मते मिळविली; शेवटी ते स्वप्नच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याची तक्रार
By admin | Updated: January 20, 2017 00:06 IST