नाशिक : गेल्या दहा-पंधरा वर्षांत मराठीबद्दल कधी नव्हे इतके बोलले जात आहे. मोठमोठे वक्ते मराठीबाबत बोलतात. चर्चा खूप होतेय, पण घडत काहीच नसून महाराष्ट्रातच मराठीची दैना होत असल्याचे रोखठोक प्रतिपादन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते कर्णिक यांना प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार देऊन कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला.
येथील कुसुमाग्रज स्मारकात कर्णिक यांना न्या. चपळगावकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्रासह जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ॲड. विलास लोणारी आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना कर्णिक यांनी हा पुरस्कार कुसुमाग्रज स्मारकात प्राप्त होत असल्याबाबत विशेष आनंद झाल्याचे सांगितले. हा पुरस्कार म्हणजे मंदिरात देवाच्या पायाला लावून मिळालेल्या श्रीफळाच्या प्रसादासारखा असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईत, नवी मुंबईत ओडिशापासून मणिपूरसारख्या राज्यांची भवने आहेत, पण मराठी भवन नसल्याची खंत आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नदेखील केले, पण पुढे काहीच घडले नाही. मराठीबद्दल राजकारण्यांना, नेत्यांना पोटतिडीक आहे, पण सचिवालयाला नाही. बाबू लोकांमध्ये दक्षिणी असो की मराठी त्यांना मराठी भाषेशी काहीच देणेघेणे नसते. त्यामुळेच मराठीची गळचेपी होते, असेही कर्णिक यांनी नमूद केले. मराठी भवन उभे राहावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालकवी यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींची स्मारके त्यांच्या गावात व्हायला हवी. अशा कामांसाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शब्द, पत वापरावी. अशा भरीव कार्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने बरोबर उभे राहावे, असेही कर्णिक यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आम्ही मराठीच्या भल्यासाठी ही संघटना स्थापन करून काही मागण्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो. त्यांच्याकडून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा करवून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी कर्णिक यांच्या जीवनावर आधारित लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक तर ॲड. लोणारी यांनी प्रतिष्ठानची भूमिका विशद केली. हेमंत टकले यांच्या हस्ते अध्यक्षांसह मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी तर विश्वस्त ॲड. अजय निकम यांनी आभार मानले.
इन्फो
कोकणातील दुसऱ्या साहित्यिकाचा सन्मान
प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. चपळगावकर यांनी कर्णिक यांची आणि माझी ६५ वर्षांपासूनची जुनी मैत्री असल्याचे सांगितले. प्रतिष्ठानच्या वतीने श्री.ना. पेंडसे यांच्यानंतर कोकणातील दुसऱ्या भूमिपुत्राला सन्मानित करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मानवतेची वेदना जागी करण्याचे सामर्थ्य असलेले कर्णिक यांचे साहित्य असून कुसुमाग्रजांशी आणि प्रतिष्ठानशी त्यांचा प्रदीर्घ काळचा ऋणानुबंध असल्याने त्यांना सन्मानित करताना मलादेखील आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले.
इन्फो
मुंबईचा टक्का ५२ वरून २२ टक्क्यांवर
मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी १०५ हुतात्मे झाले. त्यानंतरही आपण मुंबई सर्व देशाची मानली. पण महाराष्ट्र निर्मितीला १९६० साली मुंबईत ५२ टक्क्यांवर असलेला मराठी टक्का आता २२ टक्क्यांवर आला आहे. आम्ही ओरडतो, बोलतो पण लक्षात कोण घेतो, अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
...पण सांगत काहीच नाहीत
मराठीसाठी काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत चर्चा खूप होत असली तरी सध्याची मराठीची अवस्था विचार करायला लावण्यासारखी झाली आहे. राज्यात काही जण तर बोल, बोल, बोलतात पण सांगत काहीच नाहीत, असे सांकेतिक शब्दात बोलत कर्णिक बरेच काही बोलून गेले.