नाशिक : सन २०१५-१६ चे महापालिकेचे अंदाजपत्रक अद्यापही नगरसेवकांच्या हाती पडले नसताना आयुक्तांनी मात्र सन २०१६-१७ या वर्षासाठी अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारीत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.मागील वर्षी डॉ. गेडाम यांनी २० फेब्रुवारीला आपले पहिलेच अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. नव्या प्रकल्पांबाबत कोणतीही स्वप्ने न दाखविता महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे वास्तव आणि वर्षाखेरीस तीन कोटी ५१ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले होते. त्यात नवीन मिळकतींसाठी रेडिरेकनरनुसार (प्रचलित बाजारमूल्य) करआकारणी, तर पाणीपट्टीत सुमारे ३० टक्के दरवाढ सुचवितानाच औद्योगिक वसाहतीत नव्याने होणाऱ्या कारखान्यांसाठीही करवाढीची शिफारस केली होती. मात्र महासभा व स्थायी समितीने करवाढ फेटाळून लावली होती. सन २०१५-१६ या वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून वेळेत सादर होऊनही स्थायी समिती व महासभेकडून त्याला मंजुरीस विलंब लागला. अद्यापही अंदाजपत्रकाच्या प्रती नगरसेवकांना प्राप्त होऊ शकलेल्या नाहीत. आता आयुक्तांनी सन २०१६-१७ या वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेतले असून, फेब्रुवारीत वेळेत सादर करण्याची तयारी चालविली आहे. मनपाची खालावलेली आर्थिक स्थिती त्यामुळे पुन्हा एकदा करवाढीचे प्रस्ताव आयुक्तांच्या अंदाजपत्रकात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मनपाचे अंदाजपत्रक फेब्रुवारीत स्थायीवर
By admin | Updated: January 30, 2016 00:09 IST