मनमाड : येथील वागदर्डी रोडवर एका बंगल्याचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बंगल्यातील दुसऱ्या रूममध्ये झोपलेल्या कुटुंबीयांच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेऊन चोरट्यांनी आपला कार्यभार उरकला.येथील वागदर्डी रोड शिवाजीनगर भागात राहाणारे वाल्मीक केदू घायाळ (७२) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते. मी व मुलगा दोघेच घरी होतो. रात्री जेवण आटोपल्यानंतर दोघेही रूममध्ये झोपलो असताना, मुलगा स्वप्नील याला पहाटे साडेतीन वाजता जाग आली. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. त्याने आवाज दिल्यानंतर मी दरवाजा उघडला. बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने संशय बळावल्याने त्यांनी हॉल व किचनमध्ये जाऊन बघितले असता, कपाटातील व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील रोख रक्कम दीड लाख रुपये, सोने-चांदीचे दागिने व तीन मोबाइल असा एकूण सहा लाख १० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. किचनमधील लाकडी दरवाजा जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मनमाड शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए. एस. सोनवणे करत आहे. (वार्ताहर)
मनमाडला सहा लाखांची चोरी
By admin | Updated: November 24, 2015 22:24 IST