नाशिक : जगात कृषिप्रधान देश म्हणून भारताचे नाव आदराने घेतले जाते़ जगभरात मोठ्या प्रमाणात भारत धान्य निर्यात करतो; परंतु अशा देशात तेथीलच मुलांना पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण होते हे दुर्दैवी असल्याची खंत इस्त्राईल दूतावासाचे आर्थिक व व्यापार विभागाचे प्रमुख ईलियान डीआॅन यांनी येथे व्यक्त केली़ त्र्यंबकरोडवरील ठक्कर मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही खंत व्यक्त केली़ या प्रदर्शनात प्रथमच इस्त्राईलचे अधिकारी तसेच तेथील कृषी विकासाची माहिती देणाऱ्या स्टॉलचा समावेश करण्यात आला आहे़ डीवॉन म्हणाले, जगात कृषीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ यामध्ये भारतात ही संख्या मोठी आहे़ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी शेती करण्यात प्रत्यक्ष सहभाग खूप कमी लोकांचा आहे़ वास्तविक इस्त्राईल, अमेरिका, चीन या देशांमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या केवळ दोन टक्के आहे; परंतु आवश्यक शेती उत्पादनासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून मोठे उत्पादन घेतले जाते़ इस्त्राईलमध्ये शेतीसाठी चांगली परिस्थिती नसताना, केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात आधुनिक अशी शेती केली जाते़ त्या तंत्रज्ञानाचा वापर भारतात करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
कृषिप्रधान देशात मुलांना पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण
By admin | Updated: November 15, 2014 01:06 IST