मालेगाव : महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ मध्ये जलवाहिनी, रस्ते व इतर विकासकामे रखडले असल्याचा आरोप करीत प्रभाग ४चे कॉँग्रेसचे नगरसेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी काँग्रेसच्याच नगरसेवकाने महापौरांविरोधात आंदोलन केल्यामुळे कॉँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. शहरात सध्या अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रभाग क्र. ४ मध्ये देवीचा मळा भागातील सर्व्हे क्र. ७९, ८०, ८२, ८३ पवारवाडी १११ ते ११३ भागात वारंवार मागणी करूनही जलवाहिनी टाकली जात नाही. तसेच रस्ते, पथदीप व नागरी सुविधा मिळत नाहीत. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांनी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारदेखील केली आहे. तरीदेखील दखल घेतली जात नसल्यामुळे सोमवारी अब्दुल अजीज सत्तार यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी महापौर रशीद शेख यांची भेट घेऊन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केली. तसेच प्रभागातील नागरिकांनी महापौरांच्या दालनाबाहेर काही काळ ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी महापौर रशीद शेख यांनी निधी उपलब्ध झाल्यास विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले. आंदोलनात जुबेर अहमद इमानुद्दीन शेख, मुक्तार अहमद शेख, शेख जमील बागवान, शफीअली अन्सारअली, मो. फारुख मो. उस्मान आदी सहभागी झाले होते.
मालेगाव महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:24 IST