नाशिक : मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील एका इसमाचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने शनिवारी (दि़२१) मृत्यू झाला़ मन्साराम कृष्णा खैरनार (५९) असे मयत झालेल्या इसमाचे नाव असून, सोयगावातील मंगलमूर्ती कॉलनीतील ते रहिवासी आहेत़ स्वाइन फ्लूच्या लक्षणामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या आता २३ वर पोहोचली असून, दोनच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील एक महिला व एका पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, मन्साराम खैरनार यांच्या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखी असल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना खैरनार यांचा मृत्यू झाला़ स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणारे सर्वाधिक संशयित रुग्ण हे नाशिक शहर व जिल्ह्यातील असून, स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे़ सद्यस्थितीत या कक्षामध्ये १२ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी आठ पुरुष, तर चार महिला आहेत़ (प्रतिनिधी)
मालेगावच्या रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By admin | Updated: March 22, 2015 00:39 IST