संगमेश्वर : शहरातील मोसमपूल परिसरात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहतूक खोळंब्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. मोसमपुलावरील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. शनिवार असल्याने परिसरातील शनि मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. येथे पूजा साहित्य आदिंची दुकाने थाटण्यात आली होती. भाविकांची येथे दर शनिवारी मोठी गर्दी होती. या परिसरातच भिकारी ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. शहराच्या पाच भागात येथून जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांच्या बॉम्बनाशक पथकाचे वाहनही या वाहन कोंडीत अडकले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांचे कार्यालयही जवळ आहे, असे असताना येथे वाहतूक कोंडी होते. दरम्यान, याचवेळी सकाळची शाळा सुटण्याची व दुपारची शाळा भरण्याची वेळ असल्याने अनेक शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी या वाहतूक कोंडीत अडकले. अर्ध्या तास हा प्रकार सुरू होता. ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, वाहतूक कोंडीचे प्रकार येथे वारंवार होतात. नागरिकांना त्याचा मनस्ताप सोसावा लागतो, असे येथील नागरिकांनी सांगितले. (वार्ताहर)
मालेगावी वाहतूक कोंडी
By admin | Updated: January 21, 2017 23:07 IST