नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी बुधवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार असून, महाआघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्षांच्या समर्थनामुळे मनसेचा मार्ग सुकर झाला आहे. ऐनवेळी कॉँग्रेसचे दोन्ही सदस्यही महाआघाडीच्या तंबूत परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने रिपाइं कार्ड खेळत प्रकाश लोंढे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपाने मात्र दिनकर पाटील यांची उमेदवारी कायम ठेवत चमत्काराची भाषा केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीवर मनसे-५, राष्ट्रवादी-३, शिवसेना व रिपाइं-३, भाजपा-२, कॉँग्रेस-२ आणि अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल आहे. सभापतिपदासाठी सत्ताधारी मनसेने सभागृहनेता सलिम शेख यांना उमेदवारी दिली असून मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्य तीन दिवसांपासून एकत्रितरीत्या पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. शिवसेनेने यावर्षीही पुन्हा रिपाइंला उमेदवारी देत खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधत फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या पक्षांना समर्थन देण्याची साद घातली आहे. मात्र, सेना-भाजपामध्ये यापूर्वी ठरलेल्या सूत्रानुसार यंदा भाजपाला उमेदवारी असून सेनेनेच भाजपाच्या उमेदवाराला समर्थन देण्याची भाषा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाजपाकडून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाआघाडीतील मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष मिळून ९ सदस्यसंख्या बहुमतासाठी पुरेशी असल्याने मनसेचे सलिम शेख यांचे पारडे जड आहे.
सभापतिपदासाठी मनसेचा मार्ग सुकर
By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST