नाशिक : प्रत्येक महान व्यक्तीच्या मागे एक स्त्री भक्कमपणे उभी असल्याचा इतिहास आहे़ परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच्या पांरपरिक विचारांनी विषमतावादी विचारसरणीचा अंगीकार करून इतिहासकारांनीही स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला़ त्यांची महानता नाकारली़ तीच गत श्रेष्ठ धैर्यशील कर्तृत्व असणार्या सिद्धार्थपत्नी यशोधरेची केली गेली़ महान असूनही ती कायम उपेक्षितच राहिली, असे मत लेखिका गाथा सोनवणे यांनी येथे व्यक्त केले़ शालिमार चौकातील आयएमए हॉल येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्रज्ञा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘उपेक्षित सिद्धार्थपत्नी यशोधरा’ या विषयावर त्या बोलत होत्या़ सोनवणे म्हणाल्या, राज वैभव, सर्वस्व धुडकावून ज्ञानाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पतीच्या कार्यासाठी डोळ्यातील आसवांचा बांध आटवून धैर्याने हो म्हणणार्या यशोधरेमुळेच तथागत भगवान गौतमबुद्ध घडले़ यामध्ये यशोधरेची महानता प्रकर्षाने दिसून येते़ इथल्या इतिहासकारांनी आणि बौद्ध विचारवंतांनीही सिद्धार्थपत्नी यशोधरेच्या धैर्यशील कर्तृत्वाची आणि निस्सीम त्यागाची म्हणावी तशी नोंद घेतली नाही, हे दुर्दैव आहे़ याप्रसंगी पाली साहित्याचे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी पाली भाषा, बौद्ध धर्म व धर्मरक्षणासाठी पालीचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले़ आयएमएच्या माजी अध्यक्ष निवेदिता पवार, प्रज्ञा प्रबोधिनीचे अध्यक्ष सी़ टी़ देवकर, वसंत रोहम, पी़ कुमार धनविजय, बी़ एस़ खरे आदि उपस्थित होते़ विजय होर्शिळ यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)