संतोष अहेर/ दत्ता महाले येवलाजिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये उत्साह आला असून, अनेकांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मुखेड गट सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे अनेक जिगरबाज नेतेमंडळींना आपल्या सौभाग्यवतीना अथवा घरातील महिलेला संधी देऊन जिल्हा परिषदेचे राजकारण करावे लागणार हे मात्र निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, तालुक्याचे लक्ष असलेल्या या गटात प्रतिष्ठेच्या लढती रंगणार असून, पक्षापेक्षा नात्यागोत्याचे राजकारणच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या गटाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य कृष्णराव तथा बाळासाहेब गुंड करीत आहेत. गुंड यांना भुजबळ यांच्यासह स्थानिक पातळीवरील सर्वच नेत्यांचे पाठबळ तत्कालीन परिस्थितीत लाभले आणि त्यांना संधी मिळाली. तव्यावरची भाकरी फिरवायची म्हटली तर गटात बाळासाहेब यांना कदाचित थांबावे लागेल. परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करायचीच अशी भूमिका गुंड यांनी जाहीर केली आहे. मुखेड गट व गण आणि चिचोंडी गण या तिन्ही जागांवर महिला आरक्षण राहिल्याने मुखेडच्या बागायती पट्ट्यात महिलाराज अवतरणार आहे, हे मात्र नक्की. मुखेड गटातील सर्वाधिक लोकसंख्येचे (६३९३) गाव मुखेड हेच आहे. या गटाचा इतिहास पाहता या गावावर संपूर्ण निवडणुकीचे चित्र अवलंबून असण्याचा अनुभव आहे. या गटात आजपर्यंत स्थानिक उमेदवाराला अधिक महत्त्व असल्याचा अनुभव आहे. या गटातून पूर्वी प्रभावती अहेर, शोभा भवर अशा स्थानिक उमेदवाराला मतदारांनी संधी दिलेली आहे. तसे पाहता शोभा भवर या उमेदवार आर्थिक दुर्बल घटकापैकी असल्या तरीदेखील मतदारांनी त्यांना कौल देऊन विजयी केले होते. हा इतिहास असला तरी आगामी निवडणुकीत मात्र कोण कोणाच्या किती विरोधात जातो यापेक्षा मतदार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात मात्र मातब्बर उमेदवारांना उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत आहे. असे असले तरी नात्यागोत्याचे राजकारण पक्षनिष्ठेपेक्षा महत्त्वाचे ठरण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचा या गटात दबदबा आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांच्याच समर्थकाची वर्णी लागलेली आहे. त्या माध्यमातून सत्तेची फळे अनेकांनी चाखली आहेत. या निवडणुकीत बनकर यांच्या कुटुंबातील उमेदवार उभा करण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीत डावलले गेलेले काही इच्छुक सेनेच्या कंपूत दाखल होऊन निवडणुकीत रंग भरतात काय, अशीही सध्या चर्चा आहे.४मुखेड गटातही शिवसेनेचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण यावर या गटातील निवडणूक रंगणार आहे. शिवसेना नेते संभाजी पवार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे हे या गटातून कोणाला रिंगणात उतरवतात याकडे लक्ष लागून आहे. राजकारणात फार काळ कोणीही कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळेच मुखेड गटात राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांचेही कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यांचे समर्थनदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.४विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून दराडे आणि पवार आपली प्रतिष्ठा पणाला लावून आपलाच समर्थक उमेदवार निवडणूक रिंगणात येऊन त्याचा विधानसभेला कसा फायदा होईल याकडे जातीने लक्ष ठेवतील यात शंका नाही. या गटात भाजपा-सेनेला फायदा होऊ नये म्हणून बनकर आपला दीर्घकाळचा अनुभव पणाला लावून राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी व्हावी यासाठी आग्रही असल्याचे कॉँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.