नाशिक : जुने नाशिकमधील सफाई कर्मचारी गृहनिर्माण संस्थेत अफरातफर, सदनिका वाटपातील घोळ याप्रकरणी चौकशी होऊन सफाई कामगारांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याप्रकरणी दहा लाभार्थ्यांनी महापालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. परंतु, महापौरांच्या मध्यस्थीने प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर लाभार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.महालक्ष्मी चाळ येथे सदनिका वाटप घोटाळाप्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी सचिन परमार, मिलिंद जगताप, रणजित पवार, वत्सला वाघ, रंजना गांगुर्डे, अंजना शार्दुल, बाळू गांगुर्डे, चंद्रकांत मोरे, सोनू कागडा व सुमित तसांबड यांनी महापालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या १५ वर्षांपासून १० सफाई कामगार सभासदांनी गृहकर्ज फेड करूनही सदनिकेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सदनिकेच्या नियोजित किमतीपेक्षा जास्तीची रक्कम वसूल करण्यात आली. महापालिकेने संस्थेला नाममात्र भाडे तत्त्वावर दिलेला भूखंड संस्थेच्या नावावर न करता स्वत:च्या नावावर करण्यात आला आहे. सदनिका रिकाम्या ठेवून सूडबुद्धीने सभासदांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांची लूट करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांना मिळकत व्यवस्थापकाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
महालक्ष्मी चाळ सदनिका वाटप घोटाळा; उपोषण
By admin | Updated: November 20, 2015 23:50 IST