नाशिकरोड : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सामनगाव येथे रिक्षाने घरी गेलेली महिला आपले दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स रिक्षातच विसरून गेली. मात्र संबंधित रिक्षाचालकाने सोन्याचे दागिने व रोकड असलेली पिशवी संबंधित महिलेस परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.चाडेगाव आव्हाड मळा येथे राहणाऱ्या कल्याबाई शिवाजी आव्हाड या शिवाजी महाराज पुतळा उड्डाणपुलाखालील रिक्षास्टॅन्डवरील एका रिक्षाने सामनगाव येथे घरी गेल्या. त्यानंतर काही वेळाने आव्हाड यांना आपले सोन्याचे दागिने व रोकड असलेली पिशवी रिक्षातच राहिल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित शिवाजी पुतळा रिक्षास्टॅन्डवर धाव घेऊन सदर रिक्षाचा शोध सुरू केला. सदर घटना वाहतूक शाखेचे हवालदार अनिल उबाळे यांना रिक्षात सोन्याच्या दागिन्यांची पिशवी राहिल्याचे सांगितले. उबाळे यांनी तत्काळ रिक्षांची माहिती घेतली असता कल्याबाई आव्हाड या महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक सेनेचे उपाध्यक्ष गौरव भरत सोनवणे यांची रिक्षा (एमएच १५ झेड ९४९९) हिच्यामधून गेल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत रिक्षाचालक सोनवणे यांना कोणीतरी प्रवासी रिक्षात पिशवी विसरून गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रिक्षास्टॅन्डवर आपल्या सहकाऱ्यांना फोन करून रिक्षात पिशवी सापडल्याचे सांगितले. उबाळे यांनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते घरी गेले होते. त्यानंतर उबाळे व आव्हाड हे सोनवणे यांच्या घरी गेले असता त्यांनी ती पिशवी पुन्हा इमाने इतबारे परत केली. त्यानंतर आव्हाड यांनी सदर पिशवी उघडवून दाखविली असता त्यामध्ये जवळपास दहा तोळ्यांचे दागिने व काही रोकड जशीच्या तशी होती. सोनवणे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना आव्हाड यांनी पाचशे रुपये बक्षीस देऊ केले. मात्र त्या बक्षिसाला नकार देत सोनवणे यांनी तुमचे आशीर्वाद राहू द्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)
दहा तोळ्यांचे दागिने केले परत
By admin | Updated: October 24, 2015 22:04 IST