मालेगाव : शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा सर्वाधिक कमी ७ अंश सेल्सिअस इतका तपमानाचा पारा घसरल्याने मालेगावकर गारठले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून मालेगाव तालुक्यात दुष्काळाची गडदछाया पसरली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाला. गिरणा-मोसम नद्यांना पूरपाणी आले. सातही लघुप्रकल्पांसह गाव तलावांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीच्या पिकांमध्ये वाढ केली होती. रब्बीच्या पिकांना पोषक असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हिवाळ्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या तपमानातील सर्वाधिक कमी तपमान गुरुवारी नोंदविण्यात आले. शहरातील संगमेश्वर परिसरात आलेले परप्रांतीय गरम कपडे विक्रेत्यांकडे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. हुडहुडी भरणारी थंडी असल्यामुळे नागरिक कामानिमित्तच बाहेर पडताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत थंडीचा जोर कायम होता. गेल्या १ जानेवारीपासून दररोज तपमानात घट होत आहे. येथील तपमान मोजणी केंद्रात तशी नोंद झाली आहे. तपमानाचा घटता पारा बघता अजून थंडीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या थंडीचा फटका जनावरांनाही बसण्याची शक्यता आहे. सध्या पडत असलेली थंडी रब्बीच्या पिकांसाठी पोषक आहे. (प्रतिनिधी)
मालेगावच्या तपमानात नीचांकी घसरण
By admin | Updated: January 13, 2017 00:21 IST