आझादनगर : जुना आझादनगर येथे आज सकाळी साडेनऊ वाजता दोन घरांना आग लागल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंसह विक्रीसाठी आणून ठेवलेले चादर व ब्लॅँकेट जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.जुना आझादनगर भागातील गल्ली नं. २ येथे सुमारे साडेनऊ वाजता अॅँगलफर्शी घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याने धूर निघताना गल्लीतील रहिवाशांना दिसला. प्रथम नागरिकांनी बादल्यांच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु घरात विक्रीसाठी आणून ठेवलेले चादरी व ब्लॅँकेट मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यात बाजूच्या घरालाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. नियाज अह. निहाल अहमद घर नं. ११६ व महेमूद शेख अजीज घर नं. ११७ अशा दोन घरांचे मोठे नुकसान झाले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करीत नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या भागात झोपडपट्टी असून, लाकडी फळ्यांच्या घरांचे प्रमाण अधिक असल्याने मोठी हानी झाली असती. गतवर्षी अशाच प्रकारे एक घरास आग लागल्याने बजरंगवाडी येथे एकून ९ घरे जळून खाक झाली होती तर मुस्लीमपुरा भागातही ४ घरे जळाली होती. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला हटविले. (वार्ताहर)
घरांना आग लागून लाखाचे नुकसान
By admin | Updated: February 28, 2017 00:15 IST