सुरगाणा : तालुक्यातील बोरगाव, बाऱ्हे, उंबरठाण व सुरगाणा येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिक्षकांनी या चार शाखेतील जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोंडून शाखेला कुलूप ठोकून या चार शाखांमध्ये धरणे आंदोलन केले.गेल्या चार महिन्यांपासून या चारही शाखेत शिक्षकांचे मासिक वेतन जमा होते. मात्र शिक्षकांचे वेतन त्यांना दिले जात नाही. या जाचाला कंटाळून शिक्षकांनी आपले खाते देना बँक, महाराष्ट्र बँक, पंजाब बँकेत खाती उघडली पण त्याचा उपयोग झाला नाही. जिल्हा बँकेच्या शाखेतून या तीनही बँकेचे चेक बाऊन्स होऊन दोन वेळा परत आले.या प्रवासात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी वेतन शिक्षकांना मिळाले नाही.त्यामुळे शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आमचे वेतन खात्यात कधी पर्यंत वर्ग करणार अशी विचारणा करून शिक्षकांनी लेखी हमीची मागणी केली़ त्यामुळे जिल्हा शाखेत संपर्क करून मेलवरून लेखी हमी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून दिले. शिक्षकांच्या नावे निघणारा पगार त्यांनाच सबंधित शाखांमध्ये देण्यात यावा आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या़ या आंदोलनात बोरगाव येथे देवराम खांडवी, भाऊराव चौधरी, तर बा-हे येथे देविदास देशमुख, वामन चव्हाण, रमेश पडेर , बाबूराव जाधव, सुरगाणा येथे पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, तालुका अध्यक्ष एन. एस. चौधरी, एस. के. चौधरी, रतन चौधरी, सुधाकर भोये, उत्तम वाघमारे, योगेश खंबायत, तुकाराम भोरे, केशव महाले, माधव चौधरी, शिवराम देशमुख, रामदास भोये, शंकर बागुल , सिताराम कडवा, राजाराम राऊत आदि उपस्थित होते़
जिल्हा बँकेच्या चार शाखांना ठोकले कुलूप
By admin | Updated: April 28, 2017 01:48 IST