नाशिक : घुंगराचा श्रवणीय आवाज त्याच ताकदीने प्रकटलेला नृत्याविष्कार आणि कलाकारांना रसिकांनी दिलेली मनमुराद दाद हे चित्र परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय नृत्य संमेलनात बघायला मिळाले. रविवारी (दि. ३०) नृत्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी चौथ्या सत्रात नाशिकसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी विविध नृत्यांचे सादरीकरण करत नाशिककर रसिकांची मने जिंकली.कलासिद्धी नृत्यालय सासवड, कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान, मुंबई, स्मिताताई हिरे कॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्टस, नाशिक आणि कीर्ती कलामंदिर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय नृत्य संमेलनाचा रविवारी मोठ्या दिमाखात समारोप झाला. नृत्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात परिसंवादाने झाल्यानंतर चौथ्या सत्रात विविध नृत्याविष्कार कलाकारांक डून पेश करण्यात आले. यावेळी पुण्याच्या कलाकार डॉ. नंदिनी पाटील यांनी आदिताल रागातील कुचिपुडी नृत्य प्रकार सादर केला. यानंतर डॉ. कनक रेळे यांची ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली तसेच यावेळी कल्याण येथील नृत्यांगणा श्रीजा वारीयर यांनी मोहिनीआट्टम नृत्य सादर केले. नृत्यसादरीकरणाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना नाशिकच्या भरतनाट्यम कलाकार सोनाली करंदीकर, शिल्पा देशमुख आणि त्यांच्या सहकलाकारांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. नृत्य संमेलनाची सांगता पुण्याच्या नूपुरनाद संस्थेच्या डॉ. स्वाती दैठणकर यांनी भरतनाट्यम नृत्यातून भज गोविंदम् रचना सादर करत रसिकांची मने जिंकली. (प्रतिनिधी)
श्रवणीय पदन्यासाने नृत्य संमेलनाची सांगता
By admin | Updated: May 1, 2017 01:45 IST