मालेगाव : शहर व तालुक्यात शुक्रवारी सलग १४ तासांचे भारनियमन करण्यात आले. त्यामुळे येथील दैनंदिन जनजीवन प्रभावीत होऊन बॅँका, शासकीय कार्यालये, आस्थापने व उद्योग व्यवसायातील कामकाज काही ठिकाणी मंदावले तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले. ऐन तप्त उन्हाळ्यात गेल्या २० दिवसात वीज कंपनीतर्फे दुसऱ्यांदा सलग १४ तासांचे भारनियमन करण्यात आल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी वीज कंपनीच्या कामाचा धसका घेतला आहे.वीज वितरण कंपनीतर्फे २२० केव्ही मालेगाव (दाभाडी) २२० केव्ही, धुळे-मालेगाव व २२० केव्ही, चाळीसगाव - मालेगाव उपकेंद्रातून निघणाऱ्या २२० केव्ही वाहिनीच्या टॉवर लाइनमध्ये क्रॉसआर्म बसवणे, कट पॉइंट करणे तसेच तारा ओढणे इ. कामासाठी शुक्रवारी पहाटे ६ ते रात्री ८ पर्यंत सलग १४ तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला.ऐन उन्हाळ्यात ४३.२ अंश सेल्सिअस तपमानात दिवसभर सलग १४ तासांचे भारनियमन करण्यात आल्याने येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. गेल्या महिन्यातही (दि. १८) अशा प्रकारे भारनियमन करण्यात आल्यामुळे त्यावेळी शहरातील जवळपास दोन लाखांहून अधिक यंत्रमागांसह आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आज शुक्रवारी यंत्रामागास साप्ताहिक सुट्टी असल्याने या व्यवसायावर या भारनियमनाचा दुष्पपरिणाम जाणवला नाही.मात्र यंत्रमाग व्यवसायाव्यतिरिक्त विजेवर अवलंबून शहरातील इतर अनेक छोटे-मोठे उद्योग पूर्णपणे ठप्प झाले. शहरातील काही एटीएम यंत्रे बंद पडल्याने दुपारनंतर बॅँकांमधील गर्दी वाढली. तेथेही मर्यादित वीजपुरवठ्यामुळे बॅँकांचे काम थंडावले. दुपारनंतर अनेक शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, आस्थापने-दुकाने येथील इन्व्हर्टर व जनित्रद्वारा निर्मित वीजपुरवठादेखील खंडित झाला. खासगी रुग्णालये, चित्रपटगृहे, हॉटेल्स्, रसवंतीगृह, आइस्क्रीम पार्लर येथे भारनियमनाचा दुष्परिणाम झाला. शहरातील लोकसंख्या ही दाटीवाटीने आणि झोपडपट्टीमय भागात अधिक असल्याने विजेविना या भागातील नागरिकांचे प्रचंड उकाड्याने हाल झाले. घर-कार्यालयात उकाडा जाणवत असल्याने अनेकांनी बाहेर फिरस्तीवर भर दिला. विजेविना अनेकांची मोबाइल सेवा ठप्प झाली.(वार्ताहर)
जनजीवन विस्कळीत : मालेगावी सलग १४ तासांचे भारनियमन
By admin | Updated: May 8, 2015 23:49 IST