नाशिक : जिल्ह्यातील आणखी एका बिबट्याच्या बछड्याला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात हक्काचे घर मिळाले आहे. डॉ. प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी नाशिक येथे येऊन या बछड्याला ताब्यात घेतले.इगतपुरी तालुक्यातील वाघेरा गावाजवळ डोंगराच्या कपारीत गेल्या ८ फेब्रुवारी रोजी पंधरा दिवस वयाचा बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला होता. सदर बछडा अशक्त असल्याने त्याला त्याच्या आईने सोडून दिल्याचा कयास आहे. वाघ वा बिबटे अशक्त बछड्याचे पालनपोषण करीत नाही. या बछड्याला तेथील वनरक्षक सागर अहिरे याने ताब्यात घेतले. वनपाल बाळासाहेब सोनवणे व वनक्षेत्रपाल अहिरे यांच्या मदतीने तो बछडा नाशिक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आला. तेव्हा त्याची प्रकृती नाजूक होती; पण येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन आणि डॉ. प्रियंका जोपूळकर यांच्या प्रयत्नांनी हा बछडा बरा झाला. त्याला पुन्हा जंगलात सोडणे अशक्य असल्याने वन विभागाने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाशी संपर्क साधला. वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगी मिळाल्यानंतर नाशिकच्या उप वनसंरक्षक (पश्चिम) अनिता पाटील यांनी आमटे यांना तसा निरोप दिला. त्यांच्या विनंतीला मान देऊन अनिकेत आमटे स्वखर्चाने नाशिकला आले. दोन महिने वयाचा बछडा ताब्यात घेऊन ते हेमलकशाला रवाना झाले. (प्रतिनिधी)
बिबट्याच्या बछड्याला हक्काचे घर मिळाले
By admin | Updated: March 10, 2015 01:51 IST