सिडकोतील घटना : रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरणसिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वनविभागाने पोलीस ठाण्याचा परिसर पिंजून काढला, परंतु नंतर बिबट्याचे दर्शन घडले नाही. मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र ढोले व त्यांचे सहकारी दीपक वाणी रात्री कामकाज आटोपून पोलीस ठाण्याजवळ आले असता त्यांना पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच अचानक बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याचे मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या परिसरात दर्शन झाल्याने पोलीस नाईक ढोले व वाणी हे दोघेही भयभीत झाले. दरम्यान, पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या दिसून आला नाही. सकाळी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली. कड यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज दृश्य तपासले असता त्यात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती कळविण्यात आली. वनविभागाचे अधिकारी प्रशांत खैरनार हे कर्मचाऱ्यांसह संपूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु बिबट्या दिसला नाही.
पोलीस ठाणे आवारात बिबट्या
By admin | Updated: August 10, 2016 00:07 IST