नाशिकरोड : देवळाली गाव, रोकडोबावाडी येथील वालदेवी नदीकिनाऱ्याजवळील डोबी (बुवा) मळ्यात शुक्रवारी (दि़३) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाच ते सहा महिन्यांचा बिबट्याचा बछडा जेरबंद झाला़ पिंजऱ्यातून सोडवणूक करण्यासाठी बिबट्याची मादी रात्रभर डरकाळ्या फोडीत होती़ या मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे़ वालदेवी नदीकिनारी असलेल्या डोबी मळ्यालगत आर्टिलरी सेंटरचा मोठा जंगल परिसर आहे़ या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते़ रात्रीच्या वेळी नदीपात्राकडे बिबटे व त्यांचे बछडे पाणी पिण्यासाठी येत असतात़ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डोबी मळ्यातील शेतीभागात वनविभागाने काही दिवसांपूर्वीच पिंजरा लावला होता़ या पिंजऱ्यामधून शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने त्यामध्ये बिबट्या अडकल्याचे मळेकऱ्यांच्या लक्षात आले़ ही बाब त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली़ मात्र, दाट झाडी व अंधार त्यातच या पिंजऱ्यावरच बिबट्या मादी व एक बछडा बसलेला होता़ कर्मचाऱ्यांनी काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर मध्यरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी पिंजरा हलविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हलक्याशा उजेडात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या चतुराईने हा पिंजरा आवाज न करता वनविभागाच्या गाडीवर ठेवून बाहेर काढण्यास सुरुवात केली़ यावेळी उसाच्या शेतात लपलेली बिबट्या मादी व दुसरे बछडेही बाहेर आले होते़ मात्र, बिबट्या मादीने हल्ला करण्यापूर्वीच वनविभागाचे अधिकारी पिंजऱ्यातील बछड्याला घेऊन गेले़ (प्रतिनिधी)
बिबट्याचा बछडा जेरबंद
By admin | Updated: July 5, 2015 01:28 IST