जाखोरी शिवारातील जोगलटेंभी रस्त्यालगत सिराजबी शेख सुभानभाई (८५) हे शेत गट नंबर १२४ मधील मळ्यात शेळीपालनाचा व्यवसाय करतात. रविवारी (दि. २५) रोजी दिवसभर शेळ्या चराई करून, सायंकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे घरालगतच्या गोठ्यात बंदिस्त केल्या. सोमवारी (दि. २६) पहाटे साडेपाच वाजता नमाजपठण करण्यासाठी सहकुटुंब उठलेले असताना, एका शेळीचा ओरडण्याचा आवाज आल्याने, त्यांनी गोठ्यात येऊन पाहिले असता, तीन शेळ्या जागेवरच ठार झाल्याचे दिसून आले, तर दोन शेळ्या गंभीर जखमी अवस्थेत होत्या. या सर्व शेळ्या गाभण असल्याचे त्यांनी सांगितले. जखमी शेळ्यांंवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके यांनी उपचार केले. परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आल्याने वनविभागाला कळविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल आहिरराव यांच्यासह वनरक्षक गोविंद पंढरे यांनी पंचनामा केला. प्रत्येकी चार ते पाच वर्षे वयाच्या तीन गाभण शेळ्या बिबट्याने ठार केल्याने, सिराजबी शेख सुभानभाई यांचे ३४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने, त्यांनी भरपाई मिळावी व बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात जाखोरी, मोहगाव, गंगावाडी परिसरातील नागरी वस्ती व शेतांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने, ग्रामस्थ धास्तावले आहेत. याबाबतच्या तक्रारी वनविभागाला दाखल झाल्याने, बिबट्यांचा बदोबस्त करण्यासाठी पिंजरे तैनात करून, नागरिकांत जनजागृती करण्याची मोहीम वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी राबविली होती.
फोटो-
जाखोरी येथील सिराजबी शेख सुभानभाई यांच्या शेतातील गोठ्यात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार, तर दोन गंभीर जखमी झाल्या.