चांदवड : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिर झाले. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती एन.ए. इंगळे होते. समवेत सहन्यायमूर्ती एस.बी. वाळके, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिनकरराव ठाकरे, अॅड. के.एल. पाटणी, अॅड. एस.एम. सोनवणे, अॅड.आर.सी. जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात अॅड. डी.एन. ठाकरे यांनी ज्येष्ठ नागरिक महिला कामगार तसेच विद्यार्थी यांना कायद्याचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने हे शिबिर असल्याचे सांगितले तर अॅड. पी.पी. जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिनाविषयी माहिती देऊन प्रदूषणाने मोठे आजार उद्भवतात असे सांगितले. अॅड. व्ही.जी. जाधव यांनी बालकामगार विरोधी दिनाबाबत माहिती दिली.अॅड. एस.एस. थोरात यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ याबाबत उपस्थितांना माहिती दिली. सहन्यायमूर्ती एस.बी. वाळके यांनी वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे सांगून वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन केले. दिवाणी न्यायधीश एन.ए. इंगळे यांनी विविध कायद्यांची भूमिका समजावून सांगत जुलै महिन्यात आयोजित लोकन्यायालयाविषयी पक्षकारांना माहिती दिली. लोकन्यायालयात वाद मिटविल्यास वेळ आणि पैसा यांची बचत होते तसेच समजुतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकांमधील द्वेष वाढत नाही. कटूताही निर्माण होत नसल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अॅड. एस.बी. गुंजाळ यांनी तर आभार पी.एस. कोतवाल यांनी मानले.
चांदवड न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:29 IST