नाशिक : पती-पत्नीची भांडणे सामंजस्यानी सोडविली तरच संसार टिकतात़ कायद्याने केवळ निकाल मिळतो. संसार आणि माणसे मात्र कायमस्वरूपी तुटतात, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी येथे सांगितले़पंचवटीतील काळाराम मंदिरात जय अंबे चॅरिटेबल ट्रस्ट व सीतामाई महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड महिला हरिनाम सप्ताहात ‘धर्मसंस्कृती आणि कुटुंब व्यवस्था’ या विषयवार आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या़ रामतीर्थकर म्हणाल्या, पती- पत्नीने भांडण झाल्यानंतर लगेच पोलीस स्टेशन व न्यायालयात न जाता दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे़ या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यातील १२७१ होणाऱ्या फारकती थांबविल्या आहेत़ आज ही दांपत्ये सुखाने संसार करत आहेत याचा अभिमान वाटतो़ भारतीय संस्कृतीत स्त्रीला विशेष असे महत्त्व असून, स्त्री ही कुटुंब व्यवस्थेची मुख्य कणा आहे़ संस्कृती टिकवण्याचे जबाबदारी खऱ्या अर्थाने आता महिलावर्गांवर आली आहे़ महिलांनी आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार द्यावेत़ मानवता, कुटुंबाविषयी आदर, व्यक्ती शिक्षण याचे ज्ञान आईने मुलांना देण्याची गरज आहे़ कायद्याने पती-पत्नीतील भांडण मिटत नसून केवळ निकाल हाती येतो़ मुलांना वसतिगृहात न ठेवता कुटुंबातच ठेवून त्यांना कुटुंबव्यवस्थेचे शिक्षण द्यावे संसारात होणाऱ्या भांडणात मुलीच्या घरच्यांनी जास्त हस्तक्षेप करू नये, तर डिसेंबर ऐवजी नवीन वर्षे गुढीपाडव्यालाच साजरे करावे, असे कळकळीचे आवाहनही अॅड़ रामतीर्थकर यांनी येथे केले़ याप्रसंगी महंत राधाबाई सानप, विश्वनाथ घुगे, भरतानंद महाराज सांगळे,विजय घुगे, भीमराव बोडके, ज्ञानेश्वर सोमसे, संजीव अहिरे, दादासाहेब वाबळे, किरण दराडे, श्याम घुगे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
कायद्याने केवळ निकाल मिळतो
By admin | Updated: December 25, 2014 02:02 IST