नाशिक : आई आपला गर्भ नऊ महिने ज्याप्रमाणे सांभाळते, त्याच वात्सल्याने कवितेलादेखील जपलं पाहिजे; कवितेतून वेदना शब्दांचे रूप घेत असल्याचे मत कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४८व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात कविसंमेलनाने आज उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेक कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत रसिकांची दाद घेतली. काव्यसंमेलनाचा प्रारंभ काही महिन्यांपूर्वीच निधन झालेल्या जयश्री पाठक आणि कैलास पगारे यांच्या कवितांनी करण्यात आला. राम पाठक यांनी जयश्री पाठक यांची ‘कवितेच्या भेटीसाठी मी पाहीन वाट उद्याची’, तर गंगाधर आहिरे यांनी कैलास पगारे यांच्या ‘तो उगवला तेव्हा’ आदि कवितांचे सादरीकरण केले. यानंतर कवी गोविंद काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ‘माझ्या शेजारची गल्ली’ या कवितेचे विजय थोरात यांनी सादरीकरण केले. प्रथमेश पाठक यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. या काव्यसंमेलनात सादर करण्यात आलेल्या उत्कृष्ट कवितेला जयश्री पाठक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी परिचय करून दिला. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी साहित्यिक मेळाव्याची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष डॉ. विद्यागौरी टिळक, वासुदेव दशपुत्रे, रमेश जुन्नरे, जयप्रकाश जातेगावकर, स्वानंद बेदरकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साहित्यिक मेळाव्याला कविसंमेलनाने प्रारंभ
By admin | Updated: October 17, 2015 23:26 IST