सटाणा : शहराचे ग्रामदैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १२८व्या पुण्यतिथीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवाला मंगळवारी अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. मंत्रघोष आणि जयजयकारात पूजाविधी करण्यात आला. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त मंदिर व महाराजांचे निवास्थान, जुनी कचेरी संपूर्ण रोषणाईने सजविण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता सवाद्य महाराजांच्या जय घोषाने पुजाऱ्यांनी तहसीलदार अश्विनीकुमार व नेहा पोतदार, नगराध्यक्ष सुलोचना व कांतिलाल चव्हाण आणि ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि विविध अधिकाऱ्यांनी ही पूजा केली. या महापूजेसाठी शहर वपरिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यात्रोत्सवानिमित्त रथयात्रेला सन १९२१पासून प्रारंभ झाला. या रथाचे शिल्पकार कै. भिका रतन जगताप आहेत. रथाचे वैशिष्ट्य म्हणजे जगताप यांनी आपले कौशल्य पणाला लावून पंधरा फूट उंचीचा हा कोरीव रथ तयार केला. विशेष म्हणजे जगताप यांनी पायाचा स्पर्श न करता तीन वर्ष लाकडावर काम करून रथाची निर्मिती केली. त्यानंतर त्याचे १९२१मध्ये देवमामलेदारांच्या यात्रोत्सवासाठी विनामूल्य अर्पण केला. या रथ यात्रेच्या परंपरेला आज ९५ वर्ष पूर्ण होत आहे. (वार्ताहर)
देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: January 5, 2016 22:21 IST