सटाणा : छत्रपती शिवरायांच्या विचारांचे शिवशाहीचे राज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठी विधानसभेवर भगवा फडकावणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी मित्र पक्षामागे न लागता स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी आणि जनतेच्या प्रश्नासाठी विचार न करता प्रसंगी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.शिवसेनेच्या वतीने शहरात भुसे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यानिमित्ताने शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या माजी नगरसेवकांचाही भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना सत्तेत असली तरी जनतेच्या प्रश्नासाठी त्याचा विचार न करता प्रसंगी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन करून भुसे यांनी सटाणा शहराच्या भिजत असलेल्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले ते म्हणाले शहराचा पाणीप्रश्न बिकट आहे. तो सोडविण्यासाठी आपला सातत्याने आपला प्रयत्न असून, तो तडीस लावण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमास सुभाष नंदन, शरद शेवाळे, आनंदा महाले, मुन्ना सोनवणे, अनिल सोनवणे, चेतन पाटील, सचिन सोनवणे, कारभारी पगार, दिलीप शेवाळे, दिलीप अहिरे, जयप्रकाश सोनवणे, विजय सोनवणे, अमोल पवार उपस्थित होते. (वार्ताहर)
जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा
By admin | Updated: August 18, 2016 00:05 IST