पाटीलनगर ते बडदेनगर या रस्त्याचे डांबरीकरणाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकेच काम शिल्लक आहे. या रस्त्याने सिडको परिसरातील नागरिकांना अंबड - सातपूर औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. हा रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी दिला होता, परंतु ठेकेदाराला दिलेला कालावधी पूर्ण होऊन देखील रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही. यासाठी सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली असून रस्त्याचे काम भूसंपादन प्रक्रियेत रखडले होते. या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक सुधाकर बडगुजर व बंटी तिदमे यांनी दिला होता; मात्र शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या रस्त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाचा विषय मंजूर झाल्याने आता या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाटीलनगर ते बडदेनगर पर्यंतचा हा रस्ता लवकरच नागरिकांसाठी पूर्णपणे खुला होणार असून या रस्त्याचे रखडलेले काम सुरु होणार आहे. हा रस्ता लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही बडगुजर आणि तिदमे यांनी व्यक्त केला आहे.
बडदेनगर ते पाटीलनगर रस्त्यासाठी होणार भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST