नाशिक : तालुक्यातील मातोरी येथील शेतकऱ्यांची बनावट दस्तावेजाद्वारे कोट्यवधी रुपयांची जमीन काही राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांनी हडपल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.मातोरी येथील दीडशे शेतकऱ्यांच्या हक्काची सुमारे २०४ एकर शेतजमीन चुकीच्या व्यक्तीच्या नावाने खोटे कागदपत्र दाखवून संबंधितांनी ताब्यात घेतली. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर २ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु शिवसेना आणि भाजपाचे काही विद्यमान पदाधिकारी आणि माजी खासदार, त्यांचे कुटुुंबीय यांचा त्यात समावेश असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे १३ मार्च रोजी सरकारवाडा पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली. परंतु त्यांनीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून, राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असल्यानेच या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आणि जमीन परत मिळावी यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात पंडित कातड पाटील, दिलीप कातड, भिका कातड, प्रभाकर धोंडगे, बाजीराव पिंगळे, रामदास पिंगळे, आनंदा जाधव, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मातोरीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडपला
By admin | Updated: March 25, 2015 23:59 IST