पंचवटी : दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, तसेच त्रुटी राहू नये यासाठी केंद्र शासनाने महाकुंभासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची स्थापना करावी जेणेकरून चारही कुंभमेळ्यात योग्य नियोजन करता येईल याचा विचार करावा, असे शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राष्ट्रीय प्राधिकरण स्थापना करण्याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दिल्लीत संवाद साधण्यासाठी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकचा सिंहस्थ शांततेत पार पडला; मात्र केंद्र शासनाने कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही ही लांच्छनास्पद बाब आहे. हजारो भाविक सिंहस्थात येतात, त्यातून केंद्र शासनाला पैसा मिळतो. इतरत्र केंद्र शासन सिंहस्थ कुंभमेळ्याला निधी देत असते.कुंभमेळ्यात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय प्राधिकरण केल्यास सुधारणा होईल व प्रशासनाची दमछाक होणार नाही. राष्ट्रीय प्राधिकरणाचे कार्यालय मुंबईत सुरू करावे व तेथून चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन करावे. या प्राधिकरण समितीत आखाडे, तसेच धर्माचार्यांच्या माध्यमातून सदस्य नियुक्ती करावेत. यात शासकीय प्रतिनिधी, वृत्तपत्र प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
‘कुंभासाठी व्हावे प्राधिकरण’
By admin | Updated: September 23, 2015 22:38 IST