नाशिक : शहरातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले असून, एक उंटवाडी येथील बालनिरीक्षणगृह, तर दुसरा नाशिकरोडच्या पंजाबी कॉलनी येथील आहे़ या प्रकरणी सरकारवाडा व उपनगर पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, उंटवाडी रोड येथील निरीक्षणगृह व बालगृहातील कर्मचारी नानाजी फुला जगताप हे शनिवारी (दि़१५) रोजी सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामात व्यस्त होते़ त्यावेळी मुलांच्या निरीक्षणगृहातील संतोष किसन अकलू (१२) या अल्पवयीन मुलाचे सकाळी दहा ते सव्वादहा वाजेच्या सुमारास अपहरण झाले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुलाच्या अपहरणाची दुसरी घटना नाशिकरोड परिसरातील पंजाबी कॉलनीत घडली़ निर्मला निवासमध्ये राहणारे आशिषकुमार प्रेमदास मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा तेरा वर्षीय भाऊ अभिषेक प्रेमदास मिश्रा गुरुवारी (दि़१३) हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बाहेर गेला होता़ त्यास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे़ या प्रकरणी उपनगरचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण
By admin | Updated: November 18, 2014 00:59 IST