पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव किशन कुमार वैद असे अपहरण झालेल्या संचालकांचे नाव आहे. वैद यांचे अपहरण कोणी व का केले याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता अद्याप नसली तरी वैद यांचे अपहरण ज्या इनोव्हा कारमधून झाले त्या कारचे सीसीटीव्ही फूटेज पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आश्रमाचे राजेश चांद्रकुमार डावर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आश्रमाचे संचालक संजीव किशनकिशोर वैद गुरुवारी (दि. २) गायींसाठी पशुखाद्य खरेदीसाठी नागसेठिया पशू खाद्य दुकानात पिकअप (एमएच ४८ टी ३०९६) घेऊन आले असता नागसेठिया पशू खाद्य दुकानासमोर एका इनोव्हा कारमध्ये वैद यांना चौघांनी बळजबरीने बसवून घेऊन गेले. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर वैद यांचे अपहरण ओळखीच्या व्यक्तीने केले अथवा अंतर्गत वादातून केले असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतल्यानंतरच अपहरण घटनेचे गूढ उकलेल, असे पोलिसांनी सांगितले.
आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST