लासलगाव : गेल्या चार महिन्यांपासून निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांच्या होत असलेल्या हालामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. पोलिसांच्या मध्यस्थीने कुलूप उघडून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी उपचार केले.निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांची येथून सिन्नर तालुक्यातील दापूर येथे बदली झाली आहे. तेव्हापासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपचार करीत असल्याने रुग्णांचे समाधान होत नाही. रुग्ण खासगी दवाखान्यात तपासणीसाठी जात आहेत.शनिवारी लासलगाव येथील प्रमोद पाटील, संदीप उगले, राजेंद्र हलकंदर, मयूर झांबरे, महेश बकरे, सूरज श्रीवास्तव, योगेश कर्पे, शुभम शेरेकर, देवेंद्र होळकर, सागर अहिरे, चंद्रभान मोरे, उमेश शेजवळ, भारत भंडारी, सोनू शेजवळ यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून बाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे यांनी निफाड तालुका आरोग्य अधिकारी माधव अहेर यांचाशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शिवसैनिकांनी केंद्रास टाळे लावले.
निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे
By admin | Updated: October 11, 2015 22:10 IST