कसबे सुकेणे : जादा व्याजाचे आमिष दाखवून गरिबांना श्रीमंत करणाऱ्या केबीसी या दामदुप्पट योजनेने निफाड तालुक्याला कोट्यवधींचा चुना लावला असून, प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापाऱ्यांपासून बडे राजकारणीही या आमिषाला बळी पडले आहेत. सद्या तरी या गुंतवणूकदारांनी ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ चा पावित्रा घेतला आहे. केबीसी मल्टिट्रेड या कंपनीत फसवणूक झाली असल्याची पहिली फिर्याद चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील नागरिकांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांनी सोने, जागा विकून केबीसीच्या योजनेत गुंतवणूक केली आहे. निफाड तालुक्यातील निफाड, उगाव, वनसगाव, कसबे सुकेणे, ओझर या भागांत केबीसी गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे; परंतु सद्या हे सर्व गुंतवणूकदार अळीमिळी गुपचिळीच्या पवित्र्यात आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकही जादा व्याजाच्या आमिषास बळी पडले असून, चांदवड तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. बऱ्याच नागरिकांनी बँकेत सुरक्षित असलेल्या ठेवी काढून केबीसीत गुंतविल्या आहेत, तर काहींनी कर्ज काढून योजनेत सहभाग घेतला. सर्वसामान्य गुंतवणूकदारांची यात मात्र ‘तेलही आणि तूपही गेले’, अशी गत झाली आहे. एकट्या निफाड तालुक्यात सुमारे दीडशे कोटींच्यावर फसवणूक झाली असल्याची माहिती एका गुंतवणूकदाराने नाव न प्रसिद्ध करण्याची अटीवर सांगितले आहे, तर या योजनेत फसवणूक झाल्याने आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ काही नागरिकांवर आली आहे. काही गुंतवणूकदार अजूनही केबीसीतील पैसे परत मिळतील असा ठोस दावा करीत आहे. दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून शेकडो सभासदांची फसवणूक करून गाशा गुंडाळत फरार झालेल्या केबीसी कंपनीच्या संचालक, एजंटवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आडगाव शिवारातील केबीसी कंपनीच्या हॉटेल जत्राजवळ असलेल्या कार्यालयाबाहेर शेकडो सभासदांनी मोठी गर्दी केली होती. केबीसी मल्टीट्रेड कंपनीत फसवणूक झालेल्या चांदवड तालुक्यातील पिंपळनारे (वडनेरभैरव) येथील नागरिकांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुमारे ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे संचालक भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, आरती चव्हाण तसेच एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबीसी कंपनीने अल्पावधीतच सभासदांना सुरुवातीला दामदुप्पट व नंतर अडीच वर्षांत तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये जमा केले. सभासदांना कंपनीचे प्रमाणपत्र दिले; मात्र मुदतीअंती सभासदांनी चौकशी केल्यानंतर कंपनीने पैसे देण्यास नकार तर दिलाच; शिवाय ‘पैशाचे नंतर बघू, काय करायचे ते करा’ अशी धमकीही दिली. त्यानंतर मुख्य कार्यालयातील एजंट व कंपनीच्या संचालकांचे नातेवाईक पसार झाल्याने धास्तावलेल्या काही सभासदांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.शनिवारी सकाळी केबीसी कंपनीच्या फरार संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच शेकडो सभासदांनी कंपनीबाहेर एकच गर्दी केली होती.
केबीसीचा निफाडकरांनाही गंडा
By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST