नाशिकरोड : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांमधील संबंध व सत्ता स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. त्यामध्ये नाशकात बबनराव घोलप व रविकिरण घोलप या काका पुतण्याची काही वर्षांपूर्वी भर पडली होती; मात्र आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काका पुतण्याचे हे संबंध बिघडले आहेत. घोलप कुटुंबीयांनी रविकिरण घोलप यांच्याशी सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे.राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार-अजित पवार, भाजपाचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे यांचे संबंध व सत्ता स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी नाशकातील काका पुतण्याची भर पडली होती. राज्यात युती सरकारातील मंत्री असताना बबनराव घोलप यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे १९९९ मध्ये त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणे कठीण झाले. यावेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी त्यांचे पुतणे रविकिरण घोलप यांना उमेदवारी दिली आणि तेथून घोलप काका-पुतण्याचे नवे समीकरण उदयाला आले. अर्थात, रविकिरण घोलप ‘आमदार’ होऊ शकले नाही. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी वाजत गाजत शिवसेनेची मिरवणूक जात असताना शिवसेनेने दिलेला एबी फॉर्म गहाळ झाला आणि ऐनवेळी संकटमोचक म्हणून पुन्हा बबनराव घोलपांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली तेव्हा बबनराव घोलप अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर बबनरावांचे सुपुत्र योगेश घोलप अल्पवयीन असल्याने किंबहुना राजकारणात उमेदवारीसाठी तयार नसल्याने रविकिरण यांच्याकडेच बबनरावांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात होते. कालांतराने हे खोटे ठरले परंतु आता तर महापालिका निवडणुकीमुळे राजकीय आणि कौटुंबिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी उभय घोलपांमध्ये तणावाची भर पडली आहे. महापालिकेच्या प्रभाग २२ मधून बबनराव घोलप यांची कन्या माजी महापौर नयना घोलप यांच्या विरोधात पुतण्या रविकिरण घोलप याने बंडखोरी करत पत्नी सुषमा घोलप यांना रिंगणात उतरविले. त्याचा फटका बसल्याने माजी महापौर राहिलेल्या नयना यांचा अवघ्या २५० मतांनी पराभव झाला; मात्र रविकिरण यांची पत्नी सुषमा यांना जवळपास ६०० मते मिळाली. त्यामुळे व्यथित झालेल्या घोलप कुटुंबीयांनी रविकिरण यांच्याशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणल्याचे बबनवराव यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)
काका-पुतण्याचे संबंध संपुष्टात!
By admin | Updated: March 2, 2017 02:21 IST