नाशिकरोड : पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल बसस्थानकातून चोरीस गेलेली शहर बस नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे शिवारातील हॉटेल सुयोगजवळ बेवारस स्थितीत आढळून आली. बसस्थानकातून मध्यरात्रीच्या सुमारास ही बस चोरीस गेली होती. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसास बस चोरीची फिर्याद दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, दि. १७ रोजी रात्री पुणे शहर वाहतूक बस (एमएच १२ एफसी ३१२५) ही पीएमपीएलच्या स्थानकात उभी करण्यात आली होती; परंतु काही वेळाने ही बस कुणीतरी घेऊन जात असल्याची बाब तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. त्याने सदर बाब अन्य एका चालकाला सांगितल्यानंतर त्यांनी दुसरी बस घेऊन गाडीचा पाठलाग केला; परंतु नंतर ही बस दिसेनाशी झाली. त्यानंतर बस चोरीला गेल्याचा गुन्हा मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. चोरीला गेलेल्या बसचा सर्वत्र तपास सुरू होता. सदर वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांवरून झळकले. बुधवारी सायंकाळी टीव्हीवर बातम्या बघत असताना शिंदे येथील सचिन खरात यांनी पुणे शहर वाहतुकीची बस चोरीला गेल्याची बातमी पाहिली. त्यांनी तत्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पुण्याची चोरीला गेलेली शहर वाहतुकीची बस शिंदे शिवारातील सुयोग हॉटेलजवळ बेवारस स्थितीत असल्याची माहिती दिली. नाशिकरोड पोलिसांनी तत्काळ सदर बस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर पुण्याच्या मार्केट यार्ड पोलिसांशी संपर्क साधला. आज सकाळी मार्केट यार्ड पोलिसांनी चोरीस गेलेली बस ताब्यात घेऊन त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
पुण्याहून चोरीस गेलेली बस नाशकात
By admin | Updated: March 20, 2015 00:06 IST